पुणे – भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारी २०२४ रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक बदल करण्यात येणार आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक एक जानेवारी २०२४ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरुन वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड,मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे नगरकडे जावे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरूरकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
बीआरटी मार्गाचा वापर करण्यास मुभा
नगर रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी विमाननगर चौक ते खराडी जकात नाका दरम्यान बीआरटी मार्ग वापरण्याची मुभा वाहतूक पोलिसांनी दिली आहे. भीमा कोरेगाव येथे मोठ्या संख्येेने आंबेडकरी चळवळीतील अनुनायी जातात. त्यामुळे बीआरटी मार्गावरील दोन्ही मार्गिका अनुयायांच्या वाहनांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिल्या आहेत.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने पोलीस आयुक्तांच्या सूचनेला मंजुरी दिली आहे. रविवारी (३१ डिसेंबर) आणि सोमवारी (१ जानेवारी) बीआरटी मार्गावरील दोन्ही मार्गिका अनुनायांच्या वाहनांसाठी खुल्या करून देण्यात येणार आहेत, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.