टिळक स्मारक मंदिर येथे “ज्योतिर्विद्या’तर्फे निरीक्षणाची संधी
पुणे – उद्या 14 मे रोजी “झिरो शॅडो डे’ असून, यानिमित्ताने झीरो शॅडोचे तसेच दुर्बिणीतून सौर डागांचे निरीक्षण करण्याची संधी ज्योतिर्विद्या परिसंस्थेने टिळक स्मारक मंदिर येथे उपलब्ध केली आहे. हा कार्यक्रम दुपारी 12 ते एक या वेळेत सर्वांसाठी खुला आहे.
सूर्य बरोबर डोक्यावर आला की सावली आपली साथ सोडते. आपली स्वत:ची सावली आपल्या बरोबर पायाखाली पडेल किंवा एखाद्या खांबाची सावली पडणारच नाही. ही स्थिती पुण्यामध्ये स्थानिक वेळेनुसार 12 वाजता म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार 12 वाजून 31 मिनिटांनी आपली सावली दिसेनाशी होईल. सूर्य 21 जूनपर्यंत कर्कवृत्तापर्यंत प्रवास करून दक्षिणेला परत फिरला, की जुलैमध्ये अशी घटना पुन्हा घडते, परंतु त्यावेळी भारतात पावसाळा असल्याने या घटनेचे नीट निरीक्षण करता येत नाही. त्यामुळे मंगळवारी निरीक्षणाची उत्तम संधी आहे. याचा लाभ खगोलप्रेमींनी आणि विद्यार्थी, तरुणांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“झिरो शॅडो डे’ म्हणजे काय?
उत्तरायण आणि दक्षिणायनमुळे सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या 23.5 अंश उत्तरेला आणि दक्षिणेला प्रवास करतो. यामुळे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी ज्यावेळी सूर्य खगोलीय विषुववृत्त पार करत असतो. तेव्हा पृथ्वीवरील विषुववृत्तावर स्थानिक वेळेनुसार 12 वाजता सूर्य बरोबर डोक्यावर म्हणजे “ख-मध्य’ या बिंदूवर येतो. यानंतर तो उत्तरेला प्रवास करतो. आपण राहात असलेल्या गावाच्या अक्षांशाइतक्या अंशावर सूर्य आला की त्या दिवशी आपल्या गावी सूर्य स्थानिक वेळेनुसार बारा वाजता डोक्यावर म्हणजे “ख-मध्य’ या बिंदूवर येतो आणि तो दिवस त्या गावासाठी “झिरो शॅडो डे’ अर्थात “बिनसावलीचा दिवस’ म्हणून ओळखला जातो.