आई आजारी असल्याचे सांगून केला अत्याचार
पिंपरी -औरंगाबाद येथील एमआयएम पक्षातून निलंबित असलेला वादग्रस्त नगरसेवक मतीन सय्यद याच्यासह त्याचा मेहुणा व भावाच्या विरोधात 27 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीच्या आधारे नगरसेवक मतीन रशीद सय्यद, त्याचा मेहुणा हमीद सिद्धकी आणि भाऊ मोहसीन रशीद सय्यद यांच्या विरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपी मतीन सय्यद हा संबंधित महिलेला 26 नोव्हेंबर 2018 ते 24 फेब्रुवारी 2019 या कालावधीत मोटारीत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तुझी आई आजारी आहे, असे कारण सांगून तिला औरंगाबाद येथील एका घरामध्ये ठेऊन गुंगीचे औषध पाजले. तिच्यावर बलात्कार केला. तसेच, तिच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.
त्यानंतर, औरंगाबाद येथीलच एका लॉजवर मतीन सय्यद तसेच त्याचा मेहुणा व भावाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.11) गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
सध्या नगरसेवक मतीन सय्यद हा आणखी एका गुन्ह्यात औरंगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. मतीन सय्यद हा औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एमआयएममधून 2015 साली निवडून आला होता. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला विरोध केल्यामुळे त्याला भाजप व शिवसेना नगरसेवकांनी मारहाण केली होती. या प्रकरणानंतर एमआयएमने मतीन याची पक्षातून हकालपट्टी केली होती.