पुणे – …तर “त्या’ सोसायट्यांचा कचरा उचलणे थांबविणार

घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुखांचा इशारा; कचरा प्रकल्प नसणाऱ्या 90 सोसायट्यांवर कारवाई

पुणे – सत्तरपेक्षा जास्त सदनिका असणाऱ्या रहिवासी सोसायट्यांनी आपल्याच परिसरात ओल्या आणि सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प करावेत, असे बंधन असतानाही प्रकल्प नसलेल्या आणि असलेले प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या शहरातील 89 सोसायट्यांवर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. या सोसायट्यांना जास्तीत जास्त तीन वेळा दंड केला जाईल, त्यानंतरही प्रकल्प सुरू न केल्यास तेथील कचरा उचलणे थांबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले आहे.

शहरातील मोठ्या सोसायट्या, आस्थापना आणि शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्यांनी आपल्याच परिसरात ओला व सुका कचरा जिरविण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी आणि बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी कालावधी देऊन पालिकेने जनजागृती केली होती.

ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी तांत्रिक सहाय्य पुरविणाऱ्या विविध कंपन्याचे प्रदर्शनही आयोजित केले होते. त्यानंतर नोटीसही दिल्या होत्या. इतके करूनही प्रकल्प सुरू न करणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. शहरात 15 हजारांवर मोठ्या सोसायट्या आहेत.

आता यावर्षी 3 हजार 500 नवीन सोसायट्या तयार झाल्या आहेत. सोसायट्या ओला कचऱ्यावर प्रक्रिया करतात, की नाही याचे पालिकेने सर्वेक्षण केले आहे. त्यात 876 सोसायट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 89 सोसायट्यांमध्ये कचऱ्यावर प्रकिया केली जात नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे मोळक यांनी सांगितले.

दरम्यान, जागेची कमतरता असणाऱ्या सोसायट्यांना यांत्रिक कंपोस्टिंगचे पर्याय आहेत, असेही मोळक यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.