पुणे – आरटीई प्रवेशांसाठी आज अखेरचा दिवस

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्‍के राखीव जागांसाठीच्या पहिल्या सोडतीत जाहीर झालेल्या प्रवेशांसाठी शनिवारी (4 मे) अखेरचा दिवस आहे. अद्यापही सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत 8 एप्रिलला जाहीर झाली. त्यात राज्यभरातील 67 हजार 706 विद्यार्थ्यांना प्रवेश झाले. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधी 26 एप्रिलची मुदत देण्यात आली. त्यानंतर ही मुदत वाढवून 4 मे करण्यात आली. मात्र, कागदपत्र पडताळणीची संथ गती आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्यात अडचणी आल्या.

प्रवेश प्रक्रियेत शुक्रवार अखेरपर्यंत 42 हजार 382 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अद्याप जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्यास उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शाळांकडून टाळाटाळ
आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास काही शाळा टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. बालविकास इंग्लिश मीडियम स्कूल, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूलला सरकारकडून 25 टक्‍के प्रवेशांच्या शुल्काची प्रतिपूर्ती न झाल्याने प्रवेश देत नसून, शुल्क भरून प्रवेश घेण्याविषयी पालकांना सांगण्यात येत आहे. शुल्क प्रतिपूर्तीचा वाद शाळा आणि सरकार यांच्यातील असून, त्यासाठी पालकांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे या शाळांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मुदत उलटून गेल्यास राखून ठेवावेत असे निवेदन समाजवादी अध्यापक सभेचे संघटक डॉ. शरद जावडेकर, सुरेखा खरे यांनी शिक्षण संचालकांना दिले. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.