पुणे पालिकेच्या शाळा सुट्टीतही 2 तास सुरू

शाळेच्या प्रवेशासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे – महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढावी, तसेच शाळेतील मुलांची गळती कमी व्हावी या उद्देशाने शहरातील पालकांनी पुढील शिक्षणासाठी पालिकेच्याच शाळेत प्रवेश घ्यावा, या उद्देशाने शाळा दररोज 2 तास सुरू ठेवण्यात येत आहेत. दरम्यान, या निर्णयास कामगार संघटनांनी विरोध केला असला तरी शाळांची पटसंख्या वाढणे आवश्‍यक असल्याने प्रशासन या निर्णयावर ठाम आहे.

महापालिकेकडून शहरात प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या 287 शाळा चालविल्या जातात. या शाळांची पटसंख्या सुमारे 1 लाखांच्या आसपास आहे. या शाळा बालवाडी, पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी तसेच आठवी ते दहावीपर्यंत आहेत. मात्र, बालवाडीनंतर अनेकदा पालक मुलांचा प्रवेश खासगी शाळेत घेतात. तसेच, चित्र पाचवी आणि आठवीच्या वर्गाबाबतही आहे. महापालिकेच्या शाळांमधील मुले ही प्रामुख्याने आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबातील मुले आहेत. त्यामुळे हे पालक मुलांचा निकाल लागल्या नंतर लगेच पुढील प्रवेशासाठी शाळेत येतात. मात्र, पालिकेच्या शाळा बंद दिसताच मुलांचा प्रवेश खासगी शाळांमध्ये घेतात. त्यामुळे पालिकेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन आता प्रशासनाने पालकांना महापालिकेच्या शाळेत पहिली, पाचवी तसेच आठवीमध्ये प्रवेश घेता यावा साठी शाळा दररोज 2 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या सूचनाही शाळेत लावण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.