ग्रामीण भागाच्या पाण्यासाठी पुणे पालिकेची मदत

गावांना पाण्याच्या टाक्‍या पुरवणार : बापट

पुणे  – शहराच्या आजूबाजूला गावांचा विस्तार होत आहे. त्या गावांना पाणी देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्यांना पाणी देण्यासाठी महापालिकेची मदत घेणार, तसेच गावांना पाणी साठवणाच्या टाक्‍या देणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

बावधन तलावाचे काम पीएमआरडीएतर्फे करत आहोत. मानस सरोवरात पाणी आहे ते जनावरांना उपयोगी पडणार आहे. तेथील शेतीचे पंप तोडून टाकणार आहोत. ते पाणी शुद्ध करून घ्यावे लागेल. ग्रामीण भागातील लोक आणि जनावरांची सोय होईल. याशिवाय सिंथेटिकच्या तीनशे टाक्‍या वाड्यावस्त्यांवर देणार आहे. मागच्या वर्षी दीडशे टाक्‍या गोळा केल्या होत्या, असे बापट यांनी नमूद केले.

या टाक्‍या काही महापालिकेच्या माध्यमातून, स्वयंसेवी संस्थाकडून आणि सीएसआरच्या माध्यमातून गोळा करणार आहोत. ज्या गावांमध्ये त्याची गरज असेल तेथे त्या ठेवण्यात येतील. टॅंकरद्वारे त्या भरून ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यामाध्यमातून त्या पाण्याचे वाटप केले जाईल, असे नियोजन बापट यांनी सांगितले. पाण्याच्या संकटावर मात केली जाईल, कोठेही पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार नाही याची सगळी काळजी पालकमंत्री म्हणून घेतली जाईल, असे आश्‍वासन बापट यांनी दिले.

पाणी वापरासंदर्भातील करार ब्रिटीश कालीन
मुळशी धरणातून पाणी आणण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी एक कमिटी नेमली आहे. मुळात मुळशी धरणातील पाणी वापरासंदर्भातील जे सगळे करार आहेत ते ब्रिटीशांच्या काळात केलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर त्यांचे नुतनीकरण केले नाही. त्यावेळी तेवढी गरजही पडली नाही. परंतु, भविष्याचा वेध घेता या धरणातील पाणी वापरता येईल, यासंदर्भात चर्चा सुरू झाली. त्यातूनच ही कमिटी नेमण्यात आली. भविष्यात कठीण प्रसंग आले तर मुळशीतील पाणी आणता येईल का? तसेच त्या धरणातून जी वीज निर्मिती केली जाते ती कमी झाल्यास त्याची नुकसान भरपाई संबंधित कंपनीला देता येईल का, यावर विचार करणार असल्याचे बापट म्हणाले.

भामा आसखेडचे पाणी आणण्यासंदर्भात चर्चा सुरू
भामा आसखेड येथील पाणी आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे; लवकर काम होण्यासाठी संबंधित लोकांशी बोलणेही सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांशीही या संदर्भात बोलणे झाले आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांना निधी देणार आहोत त्यात आचारसंहितेचा अडसर येतो का, त्यासंदर्भात माहिती घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे बापट म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.