गुन्हे शाखेकडून ससून आणि कारागृह प्रशासनाला चार पानांची प्रश्नावली
पुणे – ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविणारा ललित पाटील फरार झाल्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी रुग्णालयात बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या एका अधिकाऱ्यासह नऊ जणांना निलंबित केले. त्यानंतर लागलीच ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डीन यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान गुन्हे शाखेने ससून प्रशासन आणि कारागृह प्रशसनाला प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती मागवली आहे. यामध्ये तब्बल तीन ते चार पानी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. रुग्णालयातून चालणाऱ्या या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती प्रचंड असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव आज(शुक्रवार) ससून सर्वोपचार रुग्णालयाची झाडाझडती घेणार असल्याचे समजते.
ससून रुग्णालयाच्या गेटवरच सव्वा दोन कोटींच्या मॅफेड्रॉन या अंमली पदार्थांसह ललित पाटीलच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यातील मुख्य आरोपी पाटील हा रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवित होता. ललितचा भाऊ आणि रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील एकजण त्याला मदत करीत होता.
पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपी पाटील हा रुग्णालयात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झाला. यामुळे ससून प्रशासन, जेल आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. याची दखल घेत संबंधित ठिकाणी बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या एका अधिकाऱ्यासह नऊ जणांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आरोपी पाटील हा रुग्णालयात टी.बी, हर्नियावर उपचार घेत असल्याचे ससून प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.
या कालावधीत त्याचे ऑपरेशन झाले नाही. परंतु पोलिसांनी अंमली पदार्थ पकडल्याची कारवाई केल्यानंतर तत्काळ दुसऱ्याच दिवशी त्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले. या सर्व प्रकरणात रूग्णालयातील अधिकाऱ्यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे ऑपरेशन डीन यांच्या देखरेखीखालीच होणार होते. याशिवाय आरोपींवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वंतत्र वार्ड क्रमांक 16 आहे. याठिकाणी गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे महिनोंमहिने मुक्काम ठोकत आहेत.
अनेक आरोपी हे किरकोळ आजारासाठी येथे थांबत असून हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. यातच पाटील रुग्णालयात मोबाईलचा वापर करत होता. येथूनच त्याने पळ काढल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला आहे. प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलीस आयुक्तांनी यांची गंभीर दखल घेतली आहे. तसेच आरोपी पाटीलच्या शोधासाठी दहा पथके रवाना करण्यात आली असून युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यात येत आहे.
ससून प्रशासनाची चुप्पी संशयास्पद
रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविणारा आरोपी पाटील पसार झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता(डीन) डॉ. संजीव ठाकूर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ललीत पाटील प्रकरणावर त्यांची अद्याप एकही प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान रुग्णालयात एक माजी आमदार, मारणे टोळीचा एक बडा गुंड आणि मुंबई ईडीच्या गुन्ह्यातील पुण्यातील एक आरोपी उपचाराच्या नावाखाली मागील अनेक महिन्यापासून ठाण मांडून आहेत.
सीसीटीव्हीची डीव्हीआर ताब्यात
दरम्यान बंडगार्डन पोलिसांनी वॉर्ड नंबर 16 बाहेरील तसेच इतर ठिकाणच्या सीसीटीव्हीचे डिव्हिआर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पळून जाणारा ललीत पाटील आरामशीर चालत जाताना दिसत आहे. तसेच तो पुढील चौकातच असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये तब्बल तासभर थांबलेला निदर्शनास आले आहे. सध्या त्याच्याकडे मोबाईल नसल्याने तांत्रिक तपासात अडथळे निर्माण झाले आहेत. त्याला मदत करणारा त्याचा भाऊ आणि एक महिला वकीलही पळून गेले आहेत. या दोघांचाही माग काढला जात आहे.