वडगाव मावळ – लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याला 40,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (दि. 5) दुपारी तीन वाजता मावळ पंचायत समिती कार्यालयात झाली.
अंकुश किसन खांडेकर (वय 57 रा. मावळ पंचायत समिती ता. मावळ ) असे लाच प्रकरणी अटक केलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ठेकेदार यांना लोहगड ग्रामपंचायत हद्दीत सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर निघाली होती. ती ऑर्डर देण्यासाठी विस्तार अधिकारी अंकुश खांडेकर यांनी तक्रारदार ठेकेदार यांना 40,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार केली असता, गुरुवारी मावळ पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकारी अंकुश खांडेकर यांनी लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस हवालदार सरिता वेताळ, पोलीस अंमलदार दिनेश माने, पोलीस चालक पांडुरंग माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.