पुणे –शहरातील ‘तेजस्विनी’ बसमधून दर महिन्याच्या आठ तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. करोनामुळे मागील दोन वर्षे बंद ठेवलेली ही योजना अखेरीस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
“तेजस्विनी’ या केवळ महिलांसाठी धावणाऱ्या बसेसमधून पीएमपीच्या तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी 2018 पासून दर महिन्याच्या आठ तारखेला मोफत प्रवासाची सेवा सुरू केली होती. सुमारे 30 बसेसद्वारे ही सेवा देण्यात येत होती.
त्यानंतर काही दिवस या योजनेची अंमलबजावणी झाली. मात्र, मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागू झाल्याने योजनेला ब्रेक लागला. करोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा पूर्ववत झाली. त्यानंतरदेखील योजना पूर्ववत करण्याचा प्रशासनाला विसर पडला होता. याबाबत दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. 8 एप्रिलपासून सेवा पूर्ववत होणार असून, महिला प्रवाशांना तेजस्विनी बसमध्ये मोफत प्रवासाची संधी दिली जाणार आहे, असे पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी सांगितले.