पुणे – स्वारगेट-कात्रज मेट्रोचा चेंडू पालिका, शासनाच्या कोर्टात

पुणे – स्वारगेट ते कात्रज मार्गावरील मेट्रोचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्‍यता आहे. मात्र, यासाठी 3, 600 कोटी, तर एलिव्हटेड (उन्नत) मार्गासाठी 1 हजार 600 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने घ्यावा, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.

शहरात सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाचे काम सुरू आहे. शहराची भविष्यातील गरज विचारात घेऊन स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रोचा विचार करण्यात येत आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना महामेट्रोला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “या मार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते. त्यातला भुयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला, तरी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासाठी येणारा खर्च कसा उभा करायचा, यावर अभ्यास सुरू आहे. केंद्र सरकार राज्य सरकार महापालिका व कर्ज असे काही पर्याय आहेत. मेट्रोसाठी निधी उभारण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 30 टक्के व महापालिका 20 टक्के अशी विभागणी होती, मात्र राज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने खर्च द्यावा अशी विचारणा केली आहे. दरवर्षी काही रक्कम देण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मात्र अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही, असे दीक्षित यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.