महागाई बरोबरच डोनेशनचाही उच्चांक

पाटण तालुक्‍यातील पालकांचे मोडले कंबरडे; मुलांच्या प्रवेशासाठी धावाधाव

कराड -पाटण तालुक्‍यामध्ये अनेक शाळांमध्ये मनमानी डोनेशन घेतले जात असल्याने पालक वर्गांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या पाल्याला चांगले व उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, म्हणून सर्वजण आग्रही असतात. परंतु हे दर्जेदार शिक्षण घ्यायचे तर शाळेला फी ही दर्जेदार द्यायची अशी स्थिती सध्या पाटणसह परिसरामध्ये दिसून येत आहे.

शासनाने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सर्वांना मोफत शिक्षण असे धोरण अवलंबले आहे. जिल्हा परिषद शाळा या सातवी किंवा आठवीपर्यंत मोफत शिक्षण देतात. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी शासन मान्यता प्राप्त खासगी शाळांची पायरी चढावी लागते. अशा वेळी या शाळा अव्वाच्या सव्वा फी मागत असल्याने सर्वसामान्य गरीब जनतेचे चांगलेच हाल होऊ लागले आहेत. अगोदरच महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य जनतेने जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे सर्वांना शिक्षण मिळण अपेक्षित आहे. यासर्वांमध्ये पालक वर्ग आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून धडपडत असतात. याचाच फायदा घेऊन या शाळा मनमानी फी च्या नावाखाली डोनेशन घेतात. अशा प्रकारामुळे शिक्षण विभागाचे व्यावसायिकरण होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत असल्याचे मत सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त केले जात आहे.

पाटणसह परिसरामध्ये दोन तीन शाळा चांगल्या नावाजलेल्या व प्रगत शाळा म्हणून नावारुपास आलेल्या आहेत. दर्जदार शिक्षण व इतर उपक्रम या शाळांनी गेल्या चार पाच वर्षामध्ये सुरू केलेले आहेत. ही बाजू मुलांच्या प्रगतीस चांगलीच आहे. परंतु या गोष्टींसाठी मुलांकडून फी घ्यायची हे चुकीचे आहे. खासगी शिक्षण संस्थांना शासन मान्यता आहे. त्या शाळांना खर्चासाठी रक्कम व शिक्षकांचे पगार ही शासन करते. काही ठिकाणी खासगी शिक्षक ठेवण्यात आले आहेत, त्यांचा पगार हा या मुलांच्या फीमधून काढण्यासाठी शाळांचे हे उद्योग सुरू आहेत.

जर इतर उपक्रम शिकवायचे असतील तर त्या शाळेतील शिक्षकांनी ते अवगत करावेत व मुलांना शिकवावेत. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण असतेच. जर फी घ्यायची असेल तर मोजकी व सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी घ्यावी. परंतु अव्वाच्या सव्वा रक्कम घेणे बरोबर नसल्याचेही पालकांमधून बोलले जात आहे. यावर शिक्षण विभागाकडून ठोस उपाययोजना राबवून सर्वसामान्य पालकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी पालकांमधून जोर धरीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.