उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती
पुणे – पुण्यातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका या ठिकाणच्या 75 हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
फडणवीस म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील तळवडे येथील येथे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याच्या कारखान्यात 8 डिसेंबर, रोजी स्फोट होऊन एकूण 11 कामगार मृत्यूमुखी पडले असून या मध्ये 6 महिला कामगारांचा समावेश आहे. 10 कामगार जखमी झाले होते. या घटनेच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पाहणी केली.
ज्याठिकाणी दुर्घटना घडली तेथे कच्चे बांधकाम असलेल्या इमारती व एक शटर असलेल्या शेडमध्ये औद्योगिक कारखाना सुरु असल्याचे निदर्शनास आले. या कारखान्यात शोभेच्या दारुपासून वाढदिवसासाठी वापरण्यात येणारे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याचे काम सुरु होते. या ठिकाणी व्यवसाय मालकाव्दारे नियुक्त महिला कामगार काम करीत होत्या. हा व्यवसाय अवैध असून परवानगी घेतलेली नव्हती.
ही जागा रेड झोनमध्ये समाविष्ट असून तळवडे परिसरात साधारणपणे तीन हजार विविध प्रकारच्या आस्थापना कार्यरत आहेत. या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना न केल्याने ही घटना घडली. अपघात झालेल्या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. धोकादायक उद्योगांवर निर्बंध टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अशा धोकादायक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येत असून येऊन कंपनींच्या आत व परीसरातील अवैध कामांवर निर्बंध घालण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.