– आरोग्य विभागप्रमुख डॉ. भगवान पवार यांची माहिती
पुणे – नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावेत, यासाठी पुणे महापालिका १९ ठिकाणी जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करणार आहे. त्यामुळे नागरिकांना अल्प दरात औषधे मिळणार आहे.
प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि मोफत उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारसह पुणे महापालिककेडून प्रयत्न केले जात आहे. राज्य शासनाने नॅशनल फेडरेशन आॅफ फार्मर्स प्रोक्योरमेंट अँड प्रोसेसिंग अँड रिटेलिंग कोआॅपरेटिव्ह आॅफ इंडिया लिमिटेड (नॅकॉफ) या संस्थेची निवड केली आहे.
मनपा आरोग्य विभागप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले की, नॅकॉफ या संस्थेला औषधांची दुकाने सुरु करण्यासाठी पुणे महापालिकेकडून जागा भाडेकराराने उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या जागेचे भाडे महापालिकेला मिळणार आहे. महागड्या औषधांच्या तुलनेत ही औषधे जवळपास ७० ते ८० टक्के स्वस्त असतात.
महापालिकेने शहरात अशा प्रकारची मेडिकल सुरू करावीत, अशी चर्चा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाली. सहा वर्षांपूर्वी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जेनेरिक औषधांचे दुकान सुरू केले आहे. आता आणखी १९ रुग्णालयांध्ये ही दुकाने सुरु करण्यात येणारआहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही दुकाने असल्याने ती २४ तास खुली असणार आहेत.