पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी “मूळचे पवार आणि बाहेरचे पवार’ याबाबत विधान केले. त्यानंतर त्याचे पडसाद उमटत असतानाच या वक्तव्याबाबत माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना शनिवारी अश्रू अनावर झाले. त्यानंतर काहीच न बोलता त्या निघून गेल्या. पुण्यात प्रचार भेटी सुरू असताना हा प्रकार घडला.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक लक्ष बारामतीच्या लढतीकडे लागलेले आहे. अशातच येथे दोन्ही पवारांकडून भावनिक विषयांना हात घालत आरोप-प्रत्यारोप केला जात आहेत. त्यातून आणखी एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. काही दिवसांंपूर्वी “जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचे. म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी, “यात चूक काय, दोन गोष्टी असतात… एक मूळचे पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार’, असे म्हणत सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचे सुचविले होते. त्यानंतर पवार यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटत असून विरोधकांकडून पवार यांच्यावर टीका केली जात आहे.
त्या का रडल्या, त्यांनाच माहिती…
दरम्यान, या प्रकाराबाबत सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्या का रडल्या हे त्यांनाच माहित… असे सांगत, “पवारसाहेब याबाबत केवळ दोनच शब्द बोलले आहेत. ते या विषयावर जास्त काही बोलले नाहीत,’ असे सांगत पवार यांच्या वक्तव्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे.