पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) १६ ते २४ डिंसेबर या कालावधीत फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या निमित्ताने येत्या गुरुवारी (दि.१४) दुपारी १२ ते १ या वेळेत ‘शांतता पुणेकर वाचत आहेत..’ हा उपक्रम होणार आहे. या निमित्ताने पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी वाचन करायचे आहे, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्र येवून केले आहे. या निमित्ताने गुरुवारी “शांतता पुणेकर वाचत आहेत” हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरेल. यात सर्व पुणेकर जिथे असतील, तेथे एक तास आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करणार आहेत.
यात महोत्सवामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झाल्यास शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यात मदत होणार आहे. या उपक्रमात शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभागी होण्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण विभागाला आणि शाळांना आवश्यक आदेश देण्याच्या सूचना राज्य सरकारचे सहसचिव इ.मु.काझी यांनी दिल्या आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार
शांतता पुणेकर वाचत आहेत.. या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे आणि संलग्न सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे आहेत. पुस्तक वाचतांनाचा विद्यार्थ्यांच्या समुहाचा फोटो; तसेच विद्यार्थ्यांना कोणते पुस्तक वाचायला आवडते, त्याची माहिती गुगल फॉर्मद्वारे भरून द्यायची आहे.
त्यासाठी https://pbf23.in/register या लिंकचा वापर करायचा आहे. या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी केले आहेत. या उपक्रमात पुणे बार असोसिएशन, लायन्स क्लब, ग्राहकपेठ आदी संस्था सहभागी होणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली.