पुणे – वकिलांच्या सोयीसाठी शिवाजीनगर न्यायालय परिसरात अथवा न्यायालयाजवळ दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभागाने केली आहे. या मागणीचे निवेदन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी अनिल पारखे आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांच्याकडे केली आहे.
मनसे राज्य विधी विभागाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य विधी विभागाचे उपाध्यक्ष ऍड. गणेश म्हस्के, ऍड. सतीश कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड. अरविंद मते (पाटील), जिल्हा अध्यक्ष ऍड. राहुल कदम, शहराध्यक्ष ऍड. अभिषेक जगताप, ऍड. भगवान थोरात, ऍड. निलेश बरडे, ऍड. विजय कुंभार हे उपस्थित होते.
यावेळी “लवकरात लवकर दुय्यम निबंधक कार्यालय न्यायालय परिसरात उपलब्ध करून देऊ, फक्त आम्हाला तुम्ही जागा उपलब्ध होण्यासाठी मदत करा’, असे असे हर्डीकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पारखे यांनीही जागा उपलब्ध झाल्यास आठ दिवसांच्या आत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात सुरू करून देऊ, असे आश्वासन दिले. ऍड. थोरवे यांनी लवकरात लवकर न्यायालय परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. दुय्यम निबंधक कार्यालय न्यायालय परिसरात झाल्यास हजारो वकिलांना त्याचा फायदा होईल व वेळेची बचत होईल. त्यामुळे येथे दुय्यम निबंधक कार्यालय असणे गरजेचे आहे, प्रतिक्रिया ऍड. अरविंद मते यांनी दिली.