मुंबई – कर्णधार संजू सॅमसन याने फटकावलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेत सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 152 धावा केल्या.
कोलकाता कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर देवदत्त पडीक्कलला उमेश यादवने 2 धावांवर बाद करत थाटात सुरुवात केली. भरात असलेला सलामीवीर जोस बटलर याही सामन्यात मोठी खेळी करणार असे वाटत होते. त्याने सुरुवातही धडाक्यात केली. पडीक्कल बाद झाल्यानंतर कर्णधार सॅमसनने सावध फलंदाजी करत बटलरसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मात्र, टीम साऊदीने बटलरची 25 चेंडूत 3 चौकारांसह केलेली 22 धावांची खेळी संपूष्टात आणली.
करुण नायर (13), रियान पराग (19) यांनी साफ निराशा केली. हे दोघे बाद होण्यापूर्वी सॅमसनने छोट्या छोट्या भागीदारी करत संघाचे शतक फलकावर लावले. अर्धशतक पूर्ण झाल्यावर सॅमसनही धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने आपल्या 54 धावांच्या खेळीत 49 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावला. तो बाद जाल्यावर शेमरन हेटमायरने नाबाद 27 धावांची खेळी करताना 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार फटकावले.
रवीचंद्रन अश्विनने नाबाद 6 धावा केल्या. या जोडीने संघाला दीडशतकी धावांची मजल मारुन दिली. कोलकाताकडून टीम साउदीने 2 गडी बाद केले. उमेश यादव, अनुकुल रॉय व शिवम मावी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 5 बाद 152 धावा. (संजू सॅमसन 54, जोस बटलर 22, रियान पराग 19, करुण नायर 13, शेमरन हेटमायर नाबाद 27, रवीचंद्रन अश्विन नाबाद 6, टीम साउदी 2-46, उमेश यादव 1-24, अनुकुल रॉय 1-28, शिवम मावी 1-33).