पुणे- शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी या विभागाचे कामकाज पूर्णपणे संगणीकृत करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी 18 कोटी 58 लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातील 11 कोटी 76 लाखांचा खर्च स्मार्ट सिटी देणार असून उर्वरीत सुमारे 6 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत देण्यात येणार आहे.
संकलनापासून ते प्रक्रियेपर्यंत राहणार वॉच
या प्रणालीअंतर्गत शहरातील झाडणकाम, घरोघरी जाऊन कचरा संकलन, कचरा वाहतुकीचे व्यवस्थापन, कचऱ्यावर प्रक्रिया, शास्त्रोक्त भूळराव प्रकल्प, विविध प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक व व्यावसायिक शौचालये आदींच्या कामांमध्ये या संगणक प्रणालीमुळे सुसूत्रता येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील हजेरी, करार, बिलिंग, जीपीएस सिस्टिम, आरएफआयडी, स्मार्ट वॉचेस यासाठी आवश्यक मॉड्यूल आणि आवश्यक असणारे हार्डवेअर पुरविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत कचरा संकलनापासून ते प्रक्रिया प्रकल्पापर्यंत प्रत्येक टप्प्यावर जीपीएस ट्रॅकिंग केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक घटकावर ऑनलाइन नियंत्रण ठेवले जाणार आहे.
कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट वॉच
शहर स्वच्छतेचे आणि कचरा संकलनाचे काम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या प्रणालीअंतर्गत हातावर स्मार्ट वॉच लावणे बंधनकारक असणार आहे. त्याद्वारे कर्मचारी प्रत्यक्ष नेमून दिलेल्या भागात स्वच्छता तसेच कचरा संकलनाचे काम करतो का यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची हजेरीही त्यावरच असणार आहे. तसेच यामुळे, एखाद्या भागात खरचं स्वच्छता झाली का, कर्मचारी प्रत्यक्षात उपस्थित होते का त्यांनी काम केले का यावर लक्ष ठेवले जाणार असून शहर स्वच्छतेच्या कामात सुसूत्रता आणली जाणार आहे.