नवी दिल्ली – दिल्लीमधील अॅक्वीला या रेस्तराँमध्ये महिलेला तिने साडी नेसली म्हणून हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला असल्याचे धक्कदायक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीमधील ऑगस्ट क्रांती मार्ग येथे हे रेस्तराँ आहे. साडी नेसलेली एक महिला रेस्तराँमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असतानाच तिला कर्मचाऱ्यांनी अडवले. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन टीका केली आहे. ड्रेस कोड पॉलिसीसंदर्भातील धोरणांवर टीका करताना हे कसले फालतू नियम आहेत असे अनेकांनी म्हटले आहे. यानंतर अखेर आता रेस्टॉरंटवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. हे हॉटेल विना परवाना चालत होतं.
या माहितीनंतर प्रशानसाकडून नोटिस जारी करण्यात आली. आता हॉटेलवर कारवाई करुन हॉटेल बंद करण्यात आलं आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी कारवाईबाबतची माहिती दिली.
दरम्यान, सोशल नेटवर्किंगवर १६ सेकंदांची एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेली महिला रेस्तराँच्या ड्रेसकोडसंदर्भातील नियमांबद्दल विचारणा करताना दिसत आहे. “साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही असं कुठे नमूद करण्यात आलंय दाखवा,” असे ही महिला विचारते. यावर रेस्तराँची कर्मचारी, “मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कंपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्यूअल (कपड्यांमधील) प्रकार नाही,” असे सांगून निघून जाते.