चाकण – सध्याच्या काळात इंटरनेट, सोशल मीडिया, व्यसधिनता यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. यावर चाकण डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे, असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. चाकण डॉक्टर असोसिएशनच्या नवनिर्वचित पदाधिकारी पदग्रहण समारंभ प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य सहसंचालक डॉक्टर अजय चंदनवाले, चाकण हार्ट फाउंडेशनचे ध्रुव कानपिळे, मोतीलाल सांकाला, डॉ. अविनाश अरगडे, रामदास धनवटे, अशोक खांडेभराड, कालिदास वाडेकर, नितीन गोरे, राजेंद्र गोरे, प्रकाश खराबी, अभिमन्यू शेलार, डॉ. विजय खरमाटे, भगवान मेदनकर, अरुण जोरी यांच्यासह अनेक डॉक्टर्स व मान्यवर उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, कामाच्या अति ताणामुळे सर्व डॉक्टर्स हे तणावग्रस्त असून त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे याकरिता डॉ. असित अरगडे न्यायवैद्यक तज्ज्ञ असून डॉक्टरांसाठी देश व राज्य पातळीवर काम करतात त्यांच्या या अनुभवाचा चाकण डॉक्टर असोसिएशनला निश्चितच फायदा होईल,असेही त्यांनी नमूद केले. मावळते अध्यक्ष डॉ. संपत केदारे म्हणाले की, मागील पाच वर्षात कोविड सारख्या आजारावर सक्षमपणे तोंड देत असताना डॉक्टर्स करिता मॅरेथॉन, क्रिकेट, फुटबॉलसारखे खेळ तसेच विविध गुणदर्शन गणेशोत्सव शैक्षणिक व्याख्याने परिसंवाद सामाजिक उपक्रमांचा आढावा दिला.
याप्रसंगी डॉ. अजय चंदनवाले यांचा असोसिएशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन तर असोसिएशनच्या 8 माजी अध्यक्षांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी जाधव, लक्ष्मण राऊत यांनी तर डॉ. प्रशांत शेलार यांनी आभार मानले.
“डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून विविध आजारांवर संशोधन झाले पाहिजे तसेच चाकण सारख्या औद्योगिक नगरीमध्ये सी.एस. आर. च्या माध्यमातून सी. एस. आर. ची स्थापना करावी.” – डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य
“रुग्णांवर होणार्या उपचारांबद्दल असलेले गैरसमज, रुग्णालयात येणार्या बिला संदर्भात होणारे वाद-विवाद, नातेवाइकांचा होणारा उद्रेक आदी घटनांवर रुग्ण-डॉक्टर सुसंवाद घडविण्याकरता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर व प्रशासन यांची समन्वय समिती असोसिएशनच्या माध्यमातून स्थापन करणार आहे. तसेच रुग्णांकरिता विविध योजना,परवाना करिता एक खिडकी योजना, न्याय वैद्यक कृती समिती आदी योजना राबविण्यात येणार आहे.” – असित अरगडे, नवनिर्वाचित अध्यक्ष, डॉक्टर असोसिएशन