पुणे – शहरातील हवेच्या प्रदूषणाबाबत “रिअल टाइम’ नोंद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (एमपीसीबी) शहरात सहा स्वयंचलित प्रदूषण मोजणी यंत्रे (सीक्यूएमएस) कार्यान्वित करण्यात आली आहेत. नॅशनल क्लीन एअर मिशन अंतर्गत ही यंत्रणा उभारण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.
वायू प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवरील धोरण म्हणून दीर्घकालीन, कालबद्ध असा राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) राबवण्यास सुरुवात केली आहे. 2024 पर्यंत देशातील सूक्ष्मकणांचे प्रमाण 20 ते 30% कमी करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात 47 स्वयंचलित कन्टिन्युअस एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम्स (सीक्यूएमएस) अर्थात स्वयंचलित हवा प्रदूषण मोजणी यंत्रे बसविण्यात येणार आहे. यापैकी पुण्यात याआधी कर्वेनगर येथे एक यंत्र कार्यान्वित होते. मात्र गेल्या वर्षभरात ही संख्या “पाच’ने वाढण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये बसविण्यात आलेल्या या यंत्रांमुळे हवेच्या प्रदूषणाची सातत्याने नोंद ठेवणे शक्य होणार असून, त्याद्वारे हवा प्रदूषणासंदर्भात योग्य उपाययोजना करण्यासाठी खात्रीशीर माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल, असे जगताप यांनी सांगितले.
10 लाख लोकसंख्येमागे एक यंत्रणा
या स्वयंचलित हवा प्रदूषण मोजणी यंत्रे ही आसपासच्या दोन किलोमीटर अंतरावरील हवेच्या सद्यस्थितीबाबत “रिअल-टाइम’ माहिती देतात. मंडळाच्या मानकांनुसार प्रति दहालाख लोकसंख्येमागे एक यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे. त्यानुसार पुण्यात पुरेशी यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी जगताप यांनी दिली.