पुणे – वल्ली (दिग्दर्शक – मनोज शिंदे), स्थळ (दिग्दर्शक – जयंत दिगंबर सोमलकर), भेरा ( दिग्दर्शक – श्रीकांत प्रभाकर), श्यामची आई (दिग्दर्शक – सुजय डहाके), नाळ भाग २ (दिग्दर्शक -सुधाकर रेड्डी यक्कंटी), छबिला (दिग्दर्शक – अनिल अमृत भालेराव) आणि जिप्सी (दिग्दर्शक – शशि चंद्रकांत खंदारे) या सात चित्रपटांची ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या (पिफ) मध्ये आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
महोत्सवातील आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागातील या चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी मंगळवारी केली. १८ ते २५ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या महोत्सवात मराठी चित्रपटांच्या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्युरी करतात. महोत्सवाच्या www.piffindia.com या अधिकृत संकेतस्थळावर या चित्रपटांची माहिती प्रदर्शित झाली आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटास पाच लाख रुपयांचा महाराष्ट्र सरकारचा संत तुकाराम पुरस्कार दिला जातो.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि छायाचित्रकारास प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (सहा पडदे), लष्कर परिसरातील आयनॉक्स (तीन पडदे) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात (दोन पडदे) या तीन ठिकाणी एकूण ११ पडद्यांवर चित्रपट दाखवले जाणार आहेत.
“महोत्सवात दरवर्षी निवडले जाणारे मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या विविध भागातील युवकांनी तयार केलेले असतात. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतात, असा अनेक वर्षांचा अनुभव असून, याही वर्षी ही परंपरा कायम राहील.” – डाॅ. जब्बार पटेल, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव