पुणे – जिल्ह्याबाहेरील एका खासदाराच्या आणि शहरातील एका आमदाराच्या टक्केवारीमध्ये सॅनिटरी नॅपकिनची निविदा प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनी गेल्या दोन वर्षांपासून सॅनिटरी नॅपकिनपासून वंचित आहेत. परिणामी, विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी बुधवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेकडून सॅनिटरी नॅपकिनची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. करोना काळात हे वाटप बंद झाले होते. त्यानंतर नॅपकिन पुरवठ्यासाठी गेल्यावर्षी निविदा प्रक्रिया राबवली गेली. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या स्टेझी हायजीन कंपनीला ठेका मिळावा, यासाठी पुणे जिल्ह्याबाहेरील शिवसेना (शिंदे गट) खासदाराने प्रयत्न केला. तसेच शहरातील भाजपच्या एका आमदाराने मे. कोलेक्स या कंपनीला ठेका मिळावा, यासाठी प्रयत्न केले.
या दोघांनी टक्केवारीसाठी आपापल्या ठेकेदाराला निविदा मिळावी, म्हणून एकमेकांच्या ठेकेदारांच्या विरोधात लेटरहेडवर लेखी तक्रारी केल्या. या वादात सॅनिटरी नॅपकिनची खरेदी रखडली आहे, असे काॅंग्रेसचे म्हणणे आहे. या निविदा प्रक्रियेत दोन्ही लोकप्रतिनिधींनी भांडार विभागाच्या उपायुक्तांवर आरोप केले. या सर्व प्रकारामुळे अद्याप महापालिका प्रशासनाने सॅनिटरी नॅपकिन खरेदी केलेली नाही.
सत्ताधारी खासदार, आमदारांना कशात पैसे खावेत, कशात टक्केवारी मिळवावी, याचेही भान राहिलेले नाही, असा आरोप करत भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींची कानउघाडणी करावी, अशी मागणी शिंदे आणि तिवारी यांनी केली. या निविदा प्रक्रियेत खासदार आणि आमदार यांच्याकडून झालेला पत्र व्यवहार गृह खात्याने तपासला पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थेट उत्पादक कंपनीकडून खास बाब म्हणून सॅनिटरी नॅपकिनची खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सीएसआरच्या माध्यमातून घेणार सॅनिटरी नॅपकिन
महापालिका प्रशासनाने सीएसआरच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एका स्वयंसेवी संस्थेने दर महिन्याला पंचवीस हजार सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. त्यांच्याकडून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाल्यानंतर ते शाळांमध्ये वितरित केले जाणार आहे, अशी माहीती प्रशासकीय सूत्रांनी दिली.