अकोले – अकोले तालुक्यातील वीरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेले प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांना ठाणे येथील वी नीड यू सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा शिक्षणव्रती पुरस्कार जाहीर झाला आहे.
अकोले तालुक्यातील विविध शाळांमध्ये गेली २८ वर्षे भाऊसाहेब चासकर अध्यापन करत आहेत.
शिक्षणातील नवे बदल, नवे विचारप्रवाह लक्षात घेऊन त्या अनुषंगाने शैक्षणिक कामकाज करताना त्यांनी प्राथमिक शिक्षणात विविध अभिनव उपक्रम राबवले आहेत. त्यांचा ‘माईंड मॅप‘ या प्रयोग विशेष उल्लेखनीय असून राज्यातील अनेक शिक्षक त्यांच्या या प्रयोगाचे अनुकरण करत आहेत.
अध्यापनाबरोबरच महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीत सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. मुक्त पत्रकार आणि निसर्ग छायाचित्रकार म्हणून लौकिक असलेल्या चासकर यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दि. ४ फेब्रुवारी २रोजी सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे पुरस्कार वितरण होणार आहे. सर्वोच्च नायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. ठाणे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या अध्यक्ष वंदना शिंदे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असणार आहेत.