पुणे – महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार, सुधारित वेतन नोव्हेंबर पेड इन डिसेंबर देण्यात येणार होते. त्यामुळे या महिन्यापासून पगारवाढ मिळणार असल्याने आनंदात असलेल्या पालिकेच्या तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
या कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनवाढीसह सातव्या वेतन आयोगाची वाढ धरून त्यांच्या वेतनाची अंतिम निश्चिती आणि त्याची तपासणीच न झाल्याने या कर्मचाऱ्यांना अद्याप वेतनच मिळालेले नाही. तसेच हे काम प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे सुरू आहे. त्यासाठी आणखी दोन आठवडे कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वेतन मिळणार असल्याने अनेक “क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.
राज्य सरकारने पुणे महापालिकेतील कर्मचऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. परिणामी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी श्रेणीनुसार पगारवाढ झालेली आहे. महापालिका प्रशासनाला यामुळे जुन्या यंत्रणेमध्ये बदल करून नवीन यंत्रणा तयार करायची आहे. यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार झालेले असले तरी अद्याप महापालिका प्रशासनाने अंतिम वेतनाची निश्चिती केलेली नाही. त्यामुळे प्रशासनास या कर्मचाऱ्यांचे वेतन सात तारखेला जमा करता आलेले नाही. त्याचा फटका विशेषत: “क’ श्रेणीतील तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बसला आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज आणि विविध प्रकारचे कर्ज घेतलेली असतात. त्यांचे हप्ते पगारामधून जात असल्यामुले वेळेत पगार झाला नाही तर व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.