पिंपरी -तीन दिवसांपासून महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई जोरात सुरू आहे. बोऱ्हाडेवाडी येथील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. या कारवाईमध्ये 8 पक्की दुमजली व तीनमजली अनधिकृत बांधकामे निष्काषित करण्यात आली.
या कारवाईमध्ये 14 हजार 760 चौरस फूट इतके क्षेत्र मोकळे करण्यात आले. सह-शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता संजय घुबे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
एक जेसीबी, 1 पोकलेन, 1 गॅस कटर, 1 क्रेन यांच्या साहाय्याने ही कारवाई केली. उप-अभियंता सूर्यकांत मोहिते, सुधीर मोरे, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य व इतर 3 कनिष्ठ अभियंता, 12 बीट निरीक्षक, क व फ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या कारवाईत भाग घेतला. तसेच 5 पोलीस कर्मचारी, 25 सुरक्षा जवान व 2 सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली.