पुणे –मेट्रो कारशेडच्या कामावर असणाऱ्या मजुराला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर मेट्रो प्रकल्पावर हल्ल्यापासून ते दहशतवादी कृत्यापर्यंत कल्पनांच्या “अफवांचा’ जोरदार गोळीबार सुरू झाला. यादरम्यान जवळ असणाऱ्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून चुकीने लांब पल्ल्याच्या बंदुकीतून आलेली गोळी असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त करून त्याबाबतची विचारणा लष्कराकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पौड रस्त्यावरील मेट्रो कारशेडमध्ये बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास मजूर काम करत होते. त्यावेळी अंजय कुमार (वय 24, रा. बिहार) याच्या छातीला काहीतरी घासून गेल्याची जाणीव त्याला झाली. त्याने पाहिले असता, छातीतून रक्त येत होते. त्याने घाबरून खाली पाहिले त्यावेळी त्याला गोळीची पुंगळी आढळली. त्याने सहकाऱ्यांना ही बाब सांगितली.
सहकाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी परिसराची पाहणी केली, त्याचवेळी जखमी अंजय कुमार याला रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती माध्यमांना गुरुवारी सकाळी कळाली. सकाळी उजेडात कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली. त्यावेळी आणखी चार पुंगळ्या त्यांना आढळल्या.
गोळ्याच्या पुंगळ्यांवरून त्या एके 47 सारख्या असल्याच्या लांब पल्ल्याच्या रायफलीच्या असाव्यात, असे अनुमान पोलिसांनी बांधले. ही माहिती काही उताविळांच्या कानी पडताच अफवांचे पीक फुटले. मेट्रो कार शेडवर दहशतवादी हल्ला झाला. या प्रकल्पाला विरोध असणाऱ्यांनी हा हल्ला घडवून आणला, अशा अफवा चर्चिल्या जाऊ लागल्या.
पोलिसांनी या घटनेनंतर मौन बाळगले होते. त्यामुळे या अफवांना काही प्रमाणात खतपाणी मिळत होते. अखेर दुपारी चारच्या सुमारास पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी या अफवांचे खंडण करत हा जवळच असणाऱ्या लष्कर प्रशिक्षण केंद्रातून चुकीने आलेल्या गोळ्या असाव्यात, असा कयास व्यक्त केला. त्यामुळे या अफवांवर पांघरूण पडले.
लष्कराचा सहभाग नाही…
कोथरूड घटनेच्या ठिकाणी लष्कराचे कोणतेही पथक नव्हते. त्यामुळे या घटनेत लष्कराचा सहभाग नसल्याचे लष्कर प्रशासनाने सांगितले आहे.