पुणे- रूबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणात ससून सर्वोपचार रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समितीने अद्यापही अहवाल तयार केलेला नाही. यामुळे एफएआयआरही दाखल होऊ शकलेली नाही. एफआयआर दाखल न झाल्याने गुन्ह्याचा तपास सुरू होऊ शकला नाही.
यासंदर्भात समितीने कोरेगाव पार्क पोलिसांना ई-मेल केला आहे. यामध्ये एजंटांची माहिती मिळू शकत नाही, त्यांची नावे अपूर्ण आहेत तसेच मोबाइलही बंद आहे. यामुळे अहवाल पूर्ण होऊ शकला नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी संबंधीत एजंटांचा शोध घ्यावा, अशी मागणीही केली आहे. मात्र, जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत पोलिसांना गुन्हेगाराचा शोध घेता येत नाही. यामुळे समितीने लवकरात लवकर एफआयआर नोंदवावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका महिलेला 15 लाखाचे आमिष दाखवून तीची किडनी रुग्णावर प्रत्यारोपीत करण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यावर नियमाप्रमाणे सरकारने समिती स्थापन केली. या समितीचा अहवाल आल्यावर एफआयआर दाखल केली जाते. मात्र, मागील महिनाभर समितीने अहवालाच अंतिम केलेला नाही. एफआयआर दाखल नसल्याने पोलिसही आरोपीचा शोध घेऊ शकलेले नाहीत.