पुणे – करोनाच्या संसर्गात पोटगीची रक्कम जमा करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी कौटुंबिक न्यायालयाकडे करण्यात आला होत्या. त्यानंतर गेल्या दीड वर्षांत न्यायालय तसेच समुपदेशकांकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. थकित पोटगीपोटी सहा कोटी 86 लाख रुपयांची रक्कम घटस्फोटीत पतीकडून मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.
कौटुंबिक न्यायालयात अनेक प्रकरणात घटस्फोटीत महिलांना पतीकडून पोटगी देण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. काही प्रकरणात मुलांसाठी दरमहा पोटगीतील रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये एकरक्कमी पोटगीची रक्कम अदा केली जाते किंवा दाम्पत्यात सामोपचाराने दरमहा पोटगीची रक्कम ठरविली जाते. करोनाच्या संसर्गामुळे काहींना घटस्फोटित पत्नीला पोटगीची रक्कम देणे शक्य झाले नव्हते.
आर्थिक चणचण, वेतन कपात, कर्जाचे हप्ते अशी कारणे देऊन पोटगीची रक्कम देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आल्याच्या तक्रारी कौटुंबिक न्यायालयाकडे करण्यात आल्या होत्या. काहींना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने पतीविरोधात दंडात्मक कारवाई तसेच पोटगीची रक्कम वसूल करण्याबाबत आदेश दिलेले नव्हते. घटस्फोटीत दाम्पत्याच्या अडचणी न्यायालयाने जाणून घेतल्या होत्या.
संकटकाळात कारवाई करणे योग्य ठरले नसते. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांकडून थकीत पोटगीची रक्कम अदा करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. एप्रिल 2020 ते जुलै 2021 या कालावधीत कौटुंबिक न्यायालयाकडून सहा कोटी 86 लाखांची थकीत पोटगी रक्कम घटस्फोटीत महिलांना मिळवून देण्यात यश आले आहे. याबाबत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी सांगितले.