पुणे – शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची भागात एका गोदामात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करून व्यावसायिकाकडील रोकड लुटली. डेक्कन कॉलेज रस्त्यावरील चंद्रमा चौकात पिस्तुलाच्या धाकाने रिक्षा प्रवासी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
खंडू भिकाजी बाळसराफ (वय ५३, रा. ऊरळी देवाची, सासवड रस्ता) यांनी यासंदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळसराफ व्यावसायिक आहेत. सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात त्यांचे गोदाम आहे. गुरूवारी (५ ऑगस्ट) कामगार आणि बाळसराफ गोदामात हिशोब करत होते. त्या वेळी तिघेजण गोदामात शिरले. त्यांनी पिस्तुलाचा धाक त्यांना दाखविला. एका चोरट्याच्या हातात पिस्तुल होते.
दहशत माजविण्यासाठी चोरट्याने गोदामातील फरशीवर पिस्तुलातून गोळी झाडली. तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून बाळसराफ यांच्याकडील १५ हजारांची रोकड आणि सोन्याची अंगठी असा ९० हजारांचा ऐवज चोरट्याने हिसकावून नेला. त्यानंतर घाबरलेल्या बाळसराफ यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
डेक्कन कॉलेज रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रिक्षातून निघालेल्या एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सांगवीतील काटेपुरम परिसरात राहायला आहेत. महिला आणि तिचे नातेवाईक रिक्षातून खराडीतून सांगवीकडे निघाले होते.
येरवड्यातील डेक्कन कॉलेज रस्त्यावरून रिक्षा रात्री साडेदहाच्या सुमारास चंद्रमा चौकातून खडकीकडे निघाली होती. त्या वेळी रिक्षाच्यामागोमाग दुचाकीवरून चोरटे आले. दुचाकीवरील चोरट्याने रिक्षातील प्रवासी महिलेवर पिस्तुल रोखले.
आरडाओरडा केल्यास गोळी घालेन, अशी धमकी देऊन दुचाकस्वार चोरट्याच्या मागे बसलेल्या साथीदाराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. झटपटीत दोन तोळे वजनाच्या मंगळसूत्राचा काही भाग चोरट्याच्या हाती लागला. तुटलेले मंगळसूत्र हिसकावून चोरटे होळकर पुलाकडे पसार झाले.