विश्रांतवाडी, दि. 5 (प्रतिनिधी) -विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉंक्रीटचा होणार आहे. या रस्त्यासह वडगावशेरी मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याने सर्व रस्ते चकाचक होणार आहेत. महापालिकेच्या एन्स्टिमेंट कमिटीच्या बैठकीत यासाठी सुमारे 42 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.
पावसाळ्यात विश्रांतवाडीकडून 509 चौक मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून हा संपूर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. तसेच, वडगाव शेरी मतदारसंघातील पावसामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यांचीही तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आयुक्तांनी वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी 42 कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने विश्रांतवाडी-टिंगरेनगर मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉंक्रिटचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रस्त्याच्या कामासाठी 19 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.
निकृष्ट डांबरीकरण…
विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्यात आले होते. हे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते विनोद पवार यांनी देखील पाठपुरावा केला होता. याबाबत “प्रभात’नेही वृत्त दिले होते. तसेच, सदर रस्त्यावर निकृष्ट कामामुळे पडलेले खड्डे दुरुस्त करावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा पवार यांनी पालिका प्रशासनाला दिला होता.
वडगाव शेरीतील रस्ते आणि मंजूर निधी
विश्रांतवाडी 509 चौक – विमानतळ रस्ता 19 कोटी
पुणे-नगर रोड ते रिसर्फेसिंग रस्ता – 15 कोटी
बिशप स्कूल ते ब्रह्मा सनसिटी रस्ता – 7 कोटी 25 लाख
509 चौक ते नागपूर चाळ रस्ता – 1 कोटी