पुणे – भिडे पूलाकडून कोथरूड तसेच कर्वेनगरकडे जाण्यासाठी नदीपात्रातून जाणारा रस्ता चारचाकी वाहनांसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. दुचाकींसाठी हा रस्ता सुरू राहणार आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने राजपूत झोपडपट्टी येथे या रस्त्यावर पावसाळी जलवाहिनी टाकण्यात आल्यानंतर हा रस्ता चारचाकी वाहनांसाठी खुला केला होता.
मात्र, या रस्त्याचा काही भाग अरूंद असल्याने सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे, महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त निर्णय घेत हा रस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद केला हे. शनिवारी या रस्त्यावर महापालिकेकडून सिमेंटचे बॅरीकेडींग करून तो बंद करण्यात आला आहे.
शहरातील कर्वे रस्त्यावरून कोथरूडकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी नदीपात्रातील रस्ता महत्वाचा ठरतो. दिवसभरात या रस्त्यावरून जवळपास दोन ते अडीच लाख दुचाकी शहरात येतात आणि नळस्टाॅप चौकातून पुढे जातात. या रस्त्यावर मागील वर्षी पर्यंत चारचाकी वाहनांना बंदी होती. मात्र, महापालिकेकडून या ठिकाणी पावसाळी वाहिनीचे काम केल्यानंतर हा रस्ता पुन्हा सुरू केला आहे.
मात्र, त्यानंतर चारचाकी वाहनांसाठी या बाजूला काही रस्ता ठेवण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कर्वे रस्त्यावर तसेच डेक्कन परिसरात महापालिकेने रस्ते खोदल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने चारचाकी वाहनांकडून या रस्त्याचा वापर वाढला होता. परिणामी, राजपूत झोपडपट्टी परिसरात रस्ता अरूंद असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र होते. अखेर, या कोंडीची दखल घेत हा रस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.