30 मेपासून प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज भरता येणार
उद्यापासून सराव अर्ज भरण्याची सुविधा
पुणे – राज्यात इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना 23 मे पासून ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच 30 मे पासून अर्जाचा भाग-1 प्रत्यक्ष भरता येणार आहे.
2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीनेच यंदाही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हिीीं:11ींहरवाळीीळेप.ीेस.ळप या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.
नोंदणी व अर्जाचा भाग -1 भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी 27 मे पर्यंत सुविधा उपलब्ध राहणार आहे. 28 मे रोजी सरावातील माहिती नष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 मे पासून विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज नोंदणी व लॉगिन करुन अर्ज भरावयाचा आहे. ऑनलाईन शुल्क भरुन अर्ज लॉक करावे लागणार असून अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची निवडही करावी लागणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.
असे आहेत नियम
केंद्रीय प्रवेश पध्दतीद्वारे बिगर अल्पसंख्यांक महाविद्यालयात 85 टक्के तर अल्पसंख्याक महाविद्यालयात 35 टक्के जागा भरण्यात येणार आहे. संस्थाअंतर्गत कोट्याद्वारे 10 टक्के व व्यवस्थापन कोट्याअंतर्गत 5 टक्के याप्रमाणे प्रवेश होणार आहेत. अल्पसंख्याक महाविद्यालयात अल्पसंख्याकसाठी 50 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आलेला आहे. व्यवस्थापन कोटा हा ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे. इनहाऊस कोटा हा त्याच संस्थेची माध्यमिक शाळा संबंधित विभागातील असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे.