पुणे –गेले वर्षभर रस्ते खोदाईचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांना चांगल्या रस्त्यांसाठी 15 मेपर्यंतची वाट पहावी लागणार आहे. महापालिकेकडून शहरात खासगी केबल कंपन्या, पालिकेचे समान पाणी योजनेचे काम तसेच ड्रेनेजच्या कामासाठी 15 पर्यंत रस्ते खोदण्यात येणार असून त्यानंतर पुढील 15 दिवसांत खोदलेल्या रस्त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी दोन महिने पाठदुखीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
महापालिकेकडून शहरात दरवर्षी पावसाळा संपताच 1 ऑक्टोबरपासून खासगी कंपन्या, शासकीय कंपन्या तसेच महापालिकेच्या विकासकामांच्या खोदाईची सुरुवात केली जाते. मागील वर्षी करोनाचे लॉकडाऊन असल्याने महापालिकेने शहराच्या दाट वस्तीमधील भागात फेब्रुवारी 2021 मध्ये रस्ते खोदाईचे काम हाती घेतले होते. तसेच शहरातही अनेक भागांत समान पाणी योजनेची जलवाहीनी टाकली जात होती. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात गेले वर्षभर हे काम पूर्ण झालेले नाहीत अशीच स्थिती शहरातील इतर भागांतही असून अनेक ठिकाणी पदपथ, मुख्य रस्ते खोदण्यात आले आहेत. तर, पालिकेने सर्व संबंधित यंत्रणांना खोदाईसाठी 15 मेपर्यंतची मुदत दिली आहे. शहरात सर्वसाधारणपणे 7 जूनपासून पाऊस सुरू होत असल्याने प्रशासनाकडून 31 मेपूर्वी रस्ते दुरूस्त केले जातात. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना चांगले रस्ते मिळतात. मात्र, गेल्यावर्षीचा अनुभव पाहता प्रशासनाकडून यंदाही ऐन पावसाळ्याच्या तोंडापर्यंत खोदाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने 31 मेपूर्वी कामे पूर्ण न झाल्यास पुणेकरांची रस्त्यांसाठी पुरती वाट लागणार आहे.
पावसाळापूर्व कामांच्या निविदा अंतिम टप्प्यात
महापालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्वीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत शहरातील नालेसफाईच्या निविदा अंतिम टप्प्यात असून 1 एप्रिलपासून ही कामे सुरू होतील. तर, त्याचवेळी उद्यान विभागास धोकादायक झाडांच्या छाटनीचे आदेश देण्यात आले असून बांधकाम विभागाकडून धोकादायक इमारती, भिंतीचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. याशिवाय, 23 गावांमधील नाले सफाईचे कामही हाती घेण्यात येणार आहे.