पुणे – “युवा संवाद’ सामाजिक संस्थेच्या वतीने आणि “कार्टुनिस्ट्स् कंबाइन’ यांच्या सहकार्याने पुण्यात प्रथमच “पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे’ पाच मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात जगभरातील 254 तर भारतातील 100 व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला आहे. “युवा संवाद’ चे अध्यक्ष धनराज गरड यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. यावेळी व्यंगचित्रकार चारुहास पंडित, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन पाच मे रोजी सकाळी साडेदहा वाजता बालगंधर्व कलादालनात मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. सदरील महोत्सव तीन दिवस चालणार आहे. तसेच या तीन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
महोत्सवा दरम्यान, परिसंवाद, व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके तसेच नवोदित आणि दिग्गज व्यंगचित्रकारांचा कलाविष्कार अनुभवता येणार आहे. चंद्रकांत पाटील महोत्सवास भेट देणार आहेत. परिसंवादामध्ये ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि कवी रामदास फुटाणे सहभागी होणार आहेत. तसेच सात मे रोजी मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते व्यंगचित्रकार बांधवांना सन्मानित करण्यात येणार आहे.