पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीचा प्रारुप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये निवासी झोन, औद्योगिक झोन, रस्ते आदी प्रस्तावित आहेत. या सर्व बाबींचा विचार यंदा रेडी रेकनरचे दर निश्चित करताना करण्यात आला आहे. वाढलेले निवासी क्षेत्र, रस्त्यांची सुविधा, त्या परिसराची विकास क्षमता यासर्व बाबींचा विचार “पीएमआरडीए’ हद्दीतील गावांमध्ये रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
रेडी रेकनरचे नवे दर दि. 1 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरासरी 11.03 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. यंदा शहरापेक्षा ग्रामीण भागात जादा वाढ करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पीएमआरडीएचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्राधिकरणाच्या हद्दीत सुमारे 730 गावांचा समावेश होतो. पूर्वीच्या प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये शेती, शेती ना विकास या झोनचे क्षेत्र मोठे होते. तर निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र हे मर्यादित होते. तसेच पाणंद रस्ते दाखविण्यात आले होते. आता मात्र पीएमआरडीएच्या विकास आराखड्यामध्ये निवासी क्षेत्राची संख्या वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर रहिवासी झोन आहे. याचसह रस्त्यांचे जाळे, औद्योगिक झोन प्रारुप विकास आराखड्यामध्ये दर्शविण्यात आले आहे. या सर्व बाबींमुळे विकासाला चालना मिळणार असल्याने याचा अंमल रेडीरेकनरमध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार या वस्तुस्थितीचा विचार करून पीएमआरडीएच्या हद्दीत जमिन व सदनिकांच्या दरांत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.