पुणे- शहरातील महापालिकेची विकासकामे आणि बांधकाम व्यावसायिकांना पालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील शुद्ध केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गेल्या अडीच महिन्यांत तब्बल 1 कोटी शुद्ध केलेले सांडपाण्याचा आतापर्यंत फेरवापर केल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. महापालिकेकडून 10 हजार लिटरच्या पाण्याच्या टॅंकरद्वारे हे पाणी देण्यात येत असून आतापर्यंत जवळपास 900 ते 910 टॅंकर पाणी वापरण्यात आल्याचे पावसकर यांनी सांगितले.
महापालिकेकडून शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 10 प्रकल्प उभारण्यात आले असून, त्या माध्यमातून दरदिवशी सुमारे 400 ते 450 एमएलडी पाणी शुद्ध करून पुन्हा नदीपात्रात सोडण्यात येते. हे पाणी बांधकामास वापरणे योग्य असले, तरी शहरातील बांधकामे तसेच महापालिकेच्या विकासकामांसाठी पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी पालिकेकडून उपाय योजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील शुद्ध केलेले सांडपाणी बांधकामे तसेच सिमेंटच्या रस्त्यांसाठी वापरण्यात यावे, असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने सातत्याने बांधकाम व्यावसायिक आणि बांधकामांसाठी पाणी पुरवणाऱ्या टॅंकर व्यावसायिकांशी चर्चा करून पाणी वापरासाठी पुढाकार घेतला असून, पुढील काळात हा वापर आणखी वाढणार असल्याचे पावसकर म्हणाले.
पालिकेचे पाणी मोफत
महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिक तसेच पालिकेच्या प्रकल्पांसाठी ठेकेदारांना दिले जाणारे पाणी मोफत दिले जाते. तर बांधकाम व्यावसायिकांना हे पाणी प्रतिटॅंकर सुमारे दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. त्यात वाहतुकीचा खर्च 500 ते 600 रूपये आकारला जातो. त्यामुळे पालिकेने पाणी मोफत दिल्याने केवळ टॅंकरचे पैसेच द्यावे लागत असल्याने हे पाणी स्वस्त मिळत असल्याने ते वापरण्याकडे व्यावसायिकांचा कल वाढत असल्याचा दावा पावसकर यांनी केला आहे.