येरवडा – भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालयातील एक ना अनेक समस्यांना अखेर वाचा फुटली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी रुग्णालयाची पाहणी करत कारभाराची झडती घेतली. दरम्यान, अधिकारी नेहमीच पाहणी करतात पण समस्या सुटत नाहीत अशी प्रतिक्रिया नागरिक नोंदवत आहेत.
या रुग्णालयातील पाणीगळती, नादुरुस्त प्रवेशद्वाराची, सीसीटीव्ही दुरुस्ती, जुन्या लिफ्ट, मुख्य प्रवेशद्वारावरील नादुरुस्त शटर, अपूर्ण अवस्थेत असलेला ऑक्सिजन निर्मिती प्लॅंट, स्वच्छतागृहाचा प्रश्न येथे कायम आहे. यापूर्वीही आयुक्त विक्रम कुमार, आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी या रुग्णालयाची पाहणी केली होती.
सध्या येथे बाह्य रुग्ण, प्रसूती, डायलिसिस, कुटुंब कल्याण, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, बालरोग विभाग, सोनोग्राफी विभाग, रक्त तपासणी विभाग, फार्मसी सुविधा आहेत. भविष्यात बेड संख्या वाढवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, परंतु अनेक महिन्यापासुन रुग्णालयात बऱ्याचशा समस्या असून त्याबाबत वेळोवेळी आरोग्य विभाग, भवन विभाग, तसेच क्षेत्रीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. असे असुनही या तिन्हीही विभागांनी कोणतीच कार्यवाही केलेली नव्हती.
येथे स्त्रीरोग तज्ज्ञ-3 अस्थिरोग तज्ज्ञ-2, भूलतज्ज्ञ- 2, फिजिशियन यांची कमतरता आहे. त्वरित भरती करण्यात यावी, शिवाय अन्य सुविधा पुरवाव्यात, फायर ऑडिट करावे असे पत्र अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना देण्यात आले होते. त्यावर ढाकणे यांनी विभागप्रमुखांना बोलावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी इंद्रायणी करचे, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील, वैद्यकीय परिमंडळ एक अधिकारी डॉ. रेखा गलांडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बागडे क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
काम थांबवण्याचे प्रयत्न
रुग्णालय परिसरातील स्वछतागृह पाडावे. यामुळे ऑक्सिजन प्लॅंटसाठी जागा होईल असे पत्र रुग्णालय आणि ठेकेदाराने दिले आहे. मात्र, येथील काही पदाधिकाऱ्यांनी यासाठी विरोध दर्शविला आहे. येरवडा प्रभाग क्रमांक 6 येथे पालिकेची जवळपास 12 स्वच्छतागृहे पाडण्यात आली आहेत.
प्रभागातील अनेक शाळांच्या मैदानासाठी मोठा निधी खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, ती मैदाने ओस पडलेली आहे. असे असूनही ऑक्सिजन प्लॅंटसाठी शाळेचे मैदान आणि स्वछतागृहांचा प्रश्न उपस्थित करून काम थांबविण्याचे प्रयत्न करण्यात आले.