भाविकांची धांदल, ढोल पथकांसह तरुणाईत उत्साह
पुणे – लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ढोल-ताशांचा दणदणाटात सुरू असताना ढगांचा गडगडाट झाला आणि क्षणात धो-धो पावसाला सुरवात झाली. अर्धा तास पडलेल्या पावसाने मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भाविकांची धांदल उडवली. मात्र, गणेशभक्तांसह पथकातील स्वयंसेवकांनी भर पावसात ढोल वाजवत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला.
अनंत चतुर्दशीला शहरासह जिल्ह्यात पावसाचे सावट असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला होता. बाप्पाला निरोप देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी लोटली होती. पावसामुळे भाविकही घरातून बाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊनच घराबाहेर पडले. सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे पाऊस कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी परिस्थिती होती. दुपारी पावणेचारच्या सुमार आकाश काळ्या ढगांनी भरून गेले आणि क्षणात जोरदार पावसाला सुरवात झाली.
भाविकांनी छत्र्या उघडून मिरवणुकीत सहभागी झाले. मात्र, गणेश मूर्तीवर छत लावण्यासह वाद्य पथकांतील ढोल, जनरेटर झाकून ठेवण्यात कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. ही धावपळ संपल्यानंतर कार्यकर्त्यांसह भाविकांनी उत्साहपूर्ण पावसात भिजत मिरवणुकीत सहभागी झाले. रस्ता मोकळा झाल्याने मिरवणूक हळूहळू पुढे सरकू लागल्या. अर्धा तास पाऊस पडल्यानंतर पावसाने क्षणभर विश्रांती घेतली.
त्यामुळे मोकळे झालेले रस्ते गर्दीने फुलले परंतू, पाचच्या सुमारास जोरदार सर आली आणि रस्त्यावर पाणी-पाणी झाले. कर्वेनगर भागात सर्वाधिक 63, तर सिंहगड रस्ता- 57 मिमी, कोथरूड- 53, कोंढवा परिसरात 48 आणि कात्रज-धनकवडी या भागात 40 मिमी पावसाची नोंद झाली. उपनगर भागात पावसाचा जोर अधिक दिसून आला.
छोट्या व्यावसायिकांचे हाल…
गणेशोत्सवातील दहा दिवस व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस असतात. त्यात विसर्जन मिरवणुकीला तर सर्वाधिक व्यावसाय होत असल्याने मिरवणूक मार्गांसह अंतर्गत रस्त्यावर खाद्यपदार्थ स्टॉलसह खेळणी, वेगवेगळे मास्क, भोंगे, फुगे विकणाऱ्यांची संख्या अधिक असते. तसेच फुले, हार विकणारेही असतात. मात्र, यंदा जोरदार पावसाने या छोट्या व्यावसायांवर पाणी फेरले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे व्यावसायिकांनी खेळणी उचलून घेतली, काही खेळणी खराब झाली. यामुळे त्यांचे नुकसान झाले.