पुणे – दीड लाख फुकट्यांवर रेल्वेची कारवाई

तब्बल 16 कोटी रुपयांचा दंड वसूल

पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत तब्बल एक लाख 52 हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या या कारवाईने जोर धरला असून पुणे विभागांतर्गत पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत 3 लाख 37 हजार घटनांमध्ये 16 कोटी 29 लाख रुपयांची दंड वसूली केली आहे. यामध्ये विना तिकीट प्रवास करणारे एक लाख 52 हजार प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून आठ कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर गेल्या वर्षी दोन लाख 87 हजार प्रकरणांमध्ये 14 कोटी 76 लाख रूपयांचा दंड वसूल केला होता.

विना तिकीट प्रवास करताना आढळल्यास कमीत कमी 250 रुपये व तिकिटाची रक्कम असा दंड आकारण्यात येतो. दरम्यान, फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा रेल्वे प्रशासनाकडून यापुढे देखील उगारण्यात येणार असून प्रवाशांनी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.