उणिवांची जाणीव : नमस्काराचा चमत्कार

प्रा. शैलेश कुलकर्णी

सद्यस्थितीत चमत्काराशिवाय नमस्कार नाही, अशी मनोधारणा झाल्याचं अनेकांच्या बाबतीत दिसून येतं. अशांमध्ये एक तर आत्मकेंद्रित व्यक्तींचा समावेश असतो अथवा कोणत्याही प्रत्यक्ष प्रचितीशिवाय काहींना नमस्कारासाठी विश्‍वास बसत नसतो. नमस्काराचं महत्त्व समजून घेण्याची जाणीव होणे आवश्‍यक असतं. दुसऱ्याला नमस्कार करण्याने आपले अवगुण कमी होतात. मोठी चूक घडली, तरी नमस्काराने क्षमा होऊ शकते. मी शरण आलो आहे, हे समोरच्याला सांगण्यासाठी फक्त एक नमस्कार पुरतो. यथायोग्य व्यक्तीसमोर मान झुकवायला लाज कशाला बाळगायची? ज्याच्यासमोर मान झुकवली, त्याच्यावरच त्या मानेच्या रक्षणाची जबाबदारी येते. म्हणून नमस्कारामध्ये मोठं सामर्थ्य दडलेलं असतं.

नमस्काराचं माहात्म्य
आपला नव्यानं झालेला परिचय दृढ व्हावा, निर्माण झालेलं नातं वृद्धिंगत व्हावं, ह्या दृष्टिकोनातूनदेखील ह्या नमस्काराचं महत्त्व आपण अनुभवत असतो. नमस्कार कोणाला, का, कधी आणि कसा करावा ह्याच्यासंबंधी काही पारंपरिक रिवाज आहेत. अर्थातच वयानं, मानानं, विचारानं, व्यवसायानं, शिक्षणानं आणि अनुभवानं जेष्ठ व्यक्तीला नमस्कार करण्याची रीत आपापल्या संस्कृतीप्रमाणे प्रचलित आहे. नमस्कारानं शुभाशीर्वाद मिळतात असं समजण्याचा प्रघात आहे. नमस्कारात प्रेम आणि विनय प्राप्त होतो, तो अनुशासन, आदर शिकवतो, मनात सुविचार येतात, क्रोध नष्ट होत जातो, अहंकार नष्ट होतो, शीतलता येते, नमस्कार दु:खाचे अश्रू पुसण्याचं काम करतो आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवतो. ह्या संस्कृतीचं आपण जतन केलं पाहिजे, ह्याची जाणीव नवीन पिढीतील किती जणांना असेल, हाच कळीचा मुद्दा आहे. अलीकडच्या काळांत ह्या नमस्काराचं महत्त्व कमी होत चालल्याचं प्रकर्षानं जाणवतं. नमस्कार करणाऱ्या व्यक्तीचा हेतू स्वार्थ साधण्याचा असल्यास त्याचं माहात्म्य अबाधित राहू शकतं का ? अनेकदा नमस्काराचे सोपस्कार, हाच एक स्वतंत्र कार्यक्रम केला जातो. तशी अपेक्षा नमस्कार करवून घेणाऱ्यांची असल्याचं समजतं, तेव्हा त्यांच्यातील उणिवांचंच दर्शन होतं. खरं तर नमस्कार ज्या व्यक्तीला केला जातो, त्याच्या शुभेच्छा आणि शुुभाशीर्वादामुळे नमस्कार करणाऱ्याच्या उणिवा दूर होतात, त्याच्या जाणिवा जपल्या जाऊन त्यांना नेणिवेपर्यंत नेण्याची आध्यात्मिक प्रक्रिया होत असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे.

नमस्कार-आदराने, की भीतीयुक्त….?
वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करणं हा आदराचा भाग झाला; परंतु तो नमस्कार जेव्हा भीतीयुक्त असतो, तेव्हा मात्र त्यातून नेमकं काय साध्य होत असतं, हेच उमगत नाही. काही वेळा एखाद्या व्यक्तीला अव्हेरून, टाळून चालत नाही; पर्याय नाही म्हणूनदेखील नमस्कार करावा लागत असतो. तर काही वेळा तो भीतीपोटीदेखील करावा लागतो. खरं तर, भीतीयुक्त आदर आणि त्यासाठी केला जाणारा नमस्कार, जी व्यक्ती तो करून घेते त्या व्यक्तीला देखील का बरं तो इतका प्रतिष्ठेचा, महत्त्वाचा, मोलाचा वाटत असतो? त्याची त्यांना काही जाणीवच होत नसते का? की केवळ
स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि मोठेपणासाठी तो करून घेतला जात असतो. काही घरांमध्ये अजूनही आणि आजही वडीलकीच्या पिढीमध्ये भीतीयुक्त आदर जपल्याचं दिसून येतं. वातावरण म्हणावं तितकं मोकळं नसतं. एक प्रकारचा तणाव, दबाव आणि भीती, त्यांतूनच मनात सतत दडपण निर्माण करणारे काही सदस्य एखाद्या कुटुंबात असतात. त्यांचा आदर करणं, त्यांचा मान राखणं हे नव्या पिढीसाठी आव्हानच असतं. त्या भीतीयुक्त आदरामुळे केलेला नमस्कार खरंच काही साध्य करत असेल का? सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी आपल्या कामाबद्दल संपर्कांत येतात अथवा त्यांना संपर्क करावा लागतो, तेव्हा देखील अनेकदा त्यांना सक्तीचा रामराम करावा लागतो. त्यांना देखील नमस्कार आदरानंच मिळावा असं का वाटत नाही? नमस्कारापेक्षा तिरस्कार होण्याची वेळ त्यांच्याबाबतीत का बरं येते? ह्याची जाणीव त्यांना होत नसते का?

देखल्या देवाला दंडवत
देखल्या देवाला दंडवत घालण्याची प्रथा देखील पूर्वापार चालत आलेली आहे. रस्त्यानं चालताना, वाहनांतून प्रवास करताना अनेकदा चौकात रहदारी अडवणाऱ्या देवळातील देवाला देखील नमस्काराचे सोपस्कार केले जाताना आपण पाहतो. देखल्या देवाला दंडवत घालणाऱ्या ह्या भक्तांच्या नमस्कार करण्याच्या तऱ्हा बघितल्या, तर बघणारी व्यक्ती अचंबित होईल अशाच त्या तऱ्हा असतात. काही शहरांमध्ये चौकाचौकात निरनिराळ्या देवांची छोटी देवळं असतात. वाहनांतून प्रवास करताना, त्या प्रत्येक देवाला घाईघाईनं नमस्कार करण्याची धडपड आणि केविलवाणी धावपळ सुरू असते. शांतपणे कोणत्याही एकाच देवाला, परंतु शास्त्रोक्त नमस्कार करण्यासाठी ह्या मंडळींना वेळ मिळत नाही, हीच उणीव म्हणावी लागेल. बरं, ही मंडळी नमस्कार करत आहेत की, अंगावर काही पडलंय ते झटकत आहेत? हेच कळत नाही. केल्या जाणाऱ्या नमस्काराचं महत्त्व लक्षात घेणं जरुरीचं वाटत नाही का? अन्यथा, अशा काही गोष्टी न करणंच योग्य.

राजकीय नमस्कार
इतर कोणत्याही नमस्कारापेक्षा राजकीय नमस्काराला राजकारणांत अनन्यसाधारण महत्त्व असतं. ह्याबाबतीत तर जेष्ठ व्यक्तीदेखील जेव्हा त्यांच्यापेक्षा वयानं, अनुभवानं, कार्यानं, शिक्षणानं लहान असलेल्या, परंतु घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांत एखादं स्थान मिळवलेल्या व्यक्तीपुढे नतमस्तक होतात, तेव्हा तो नमस्कार चमत्कारिक वाटतो, असंच म्हणावं लागेल. केवळ प्रचार आणि लाचार ह्याच दोन बाबी ह्या नमस्कारात सामावलेल्या असतात. सर्वात मोठी उणीव ही की, ह्याची जाणीव कोणालाच होत नसते. नेत्यांचे नमस्कार तर अनेकदा केवळ निवडणुकींच्या मतापुरतेच असतात, हे अनेकांच्या बाबतीत आपण अनुभवतो. निवडणुकीपूर्वी हे नेते मतदारांना नमस्कार करताना दिसत असतात, तर निवडून आल्यावर त्याच नेत्यांना सतत नमस्कार करून, काही वेळा नतमस्तक होऊन भेटावं लागतं आणि त्यांच्याकडून शक्‍य झालंच तर एखादं काम होऊ शकतं. केवळ एका मतासाठी केलेला नमस्कार किती मोलाचा असतो ते फक्त एखादा नेताच जाणू शकतो. हा स्वार्थी नमस्कार सर्वसाधारण व्यक्तीच्या लक्षांत न येणं ही उणीव म्हणायची की, जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष म्हणायचं? केवळ एका नमस्कारानं पाच वर्षांची सत्ता उपभोगणे हेच ज्यांचं उद्दिष्ट असतं, त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव आपण करून देणारच नाहीत का?

चमत्कारामुळे नमस्कार
अलीकडच्या काळांत आपल्याला स्वयंघोषित महाराज आणि त्यांचे विविध किस्से बघायला, ऐकायला मिळत आहेत. ह्या बुवाबाजी करणाऱ्या महाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. त्यांच्या एखाद्या जादुई चमत्काराने त्यांचे अनेक भक्त तयार होतात. दिवसरात्र त्यांच्या सेवेत राहतात, त्यांच्या राहण्याखाण्याची स्वखर्चानं पंचतारांकित व्यवस्था देखील करतात. त्यांचं देशविदेशातील फिरणं असेल, पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणं असेल, विमानाचा प्रवास असेल; तेव्हा त्यांच्या सेवेसाठी तत्पर असणारे काही निस्सीम भक्तगण सदैव त्यांच्या दिमतीला असतात. केवळ एखाद्या हातचलाखीच्या कारणामुळे पदोपदी नमस्कार करणारा भक्तगण लाखांच्या संख्येनं आशीर्वाद घेण्यासाठी, ह्या स्वयंघोषित महाराजांच्या चरण तीर्थासाठी आतुर झालेला असतो. अशा वेळी कौतुक वाटतं त्या स्वयंघोषित महाराजांच्या मार्केटिंग कौशल्याचं. त्यांच्या चरणाशी लीन होणाऱ्या परम प्रिय भक्तांच्या उणिवा त्यांना पूर्णपणे कळलेल्या असतात. केवळ त्यांच्या जाणिवा जपल्याचं त्यांना, व्यावसायिक रंगभूमीवर साकारलं जातं तसं, एकेक नाट्य साकारायचं असतं. त्यांच्या भक्तांसाठी तोच, खरं तर, चमत्कार असतो आणि मग नमस्कारांसाठी रांग लागते, काही वेळा भक्त रांगेतच नाही, तर रांगत देखील येऊन चरणामृत घेतात. त्यांना “स्व”अस्तित्वाचीदेखील जाणीव होत नसते. चमत्काराच्या कारणाने केलेला नमस्कार त्यांना अधिक लाभदायक वाटत असतो.

नमस्काराचा चमत्कार
चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं जरी चित्र असलं, तरीही नमस्काराचा चमत्कार आपण नेहमीचा अनुभवत असतो. “गरजवंताला अक्कल नसते.’ ह्या उक्तीप्रमाणे आपल्या कामासाठी दिवसभरांत अनेकांना, त्यांची पात्रता आणि विशेष जरुरी नसताना देखील नमस्कार करत फिरावं लागतं. एखादं काम करवून घेण्यासाठी, विशेषतः सरकारी कचेऱ्यांत शिपायालादेखील साहेब म्हणावं लागतं आणि तो शिपाईदेखील आपल्या नमस्काराचा चमत्कार कसा होऊ शकतो, ते आपल्याच अधिकारवाणीने, कोणताही अधिकार नसतानाही, सांगत फिरत असतो. रस्त्यावरील एखाद्या चौकात उभ्या असलेल्या पोलिसांनी आपली गाडी अडवली. पुढे काही होण्यापूर्वी आपण केलेला नमस्कार देखील निश्‍चितच चमत्कार घडवून आणतो. मनोभावे केलेला नमस्कार आपल्या मनाला उभारी, बळ देतो, आत्मविश्‍वासाची जाणीवही करून देतो, शुभेच्छा देतोच आणि कालांतरानं यशप्राप्तीही देतो. नमस्कारानं निर्माण होणारं सकारात्मक वातावरण हे निश्‍चितच आनंद देत असतं. नमस्कार, उणिवा दूर करत असतोच, जाणिवा जपून नेणिवेपर्यंतही घेऊन जात असतो.

जगाच्या पाठीवर कोणत्याही प्रांतात आपण गेलो, तरी आपल्याला नव्यानं भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नमस्कार करण्याची पारंपरिक प्रथा सर्वत्र आहे. अर्थात, प्रत्येक प्रांतात नमस्काराची पद्धत निराळी असते; परंतु हेतू मात्र बहुतांशी सारखाच आणि एकच असतो, तो म्हणजे आपल्या अंतर्मनातील आदरभाव व्यक्त करणं होय. ज्या ठिकाणी आपण आदर व्यक्त करतो, त्याच ठिकाणी आपण नमस्कार करतो. काही वेळा तर नतमस्तक देखील होतो. जेव्हा आदर दिला जातो, तेव्हाच तो आपल्याला मिळायलाही लागतो हे आपण अनुभवत असतो. आपल्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. म्हणूनच आपल्या नमस्काराच्या क्रियेला नमस्काराचीच प्रतिक्रिया मिळते. ह्या नमस्काराची सुरुवात आपल्या घरापासूनच होत असते. “मातृ-पितृ-आचार्य देवो भव। म्हणताना आपल्या संस्कारक्षम मनाला आई-वडील-गुरू ह्यांच्यापुढे नतमस्तक होण्याची सवय जडलेली असते आणि तेव्हापासून नमस्काराचा चमत्कार आपण अनुभवत आलेले असतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.