पुणे : करोनानंतर गणेशोत्सव मंडळांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सव ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालनही कसबा विधानसभा मतदारांत भाजपच्या मदतीला उतरणार असल्याचे शहराच्या राजकीय वर्तूळात बोलले जात आहे. मंगळवारी पुण्यात मुक्कामी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते तसेच वेगवेगळया संस्था संघट्नांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यात, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे 20 मिनिटे बालन यांच्याशी वेगवेगळया मुद्दावर चर्चा केली आहे. त्यामुळे, या दोघांमधील चर्चेचे वेगवेगळे संदर्भ काढले जात असून गणेशमंडळांचे आधारस्तंभ बनलेले बालन कसबा विधानसभा निवडणूकीत भाजपला मदत करणार असल्याची राजकीय चर्चा आहे. दरम्यान, याबाबत बालन यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
देशातील सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ कसब्यातूनच झाली. त्यामुळे, शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये सर्वाधिक गणेश मंड्ळे आहेत. करोनामुळे सलग दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने गणेश उत्सवालाही त्याची झळ बसली होती. अशा वेळी बालन यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील जवळपास 150 ते 200 मंडळांना वेगवेगळया माध्यमातून मदतीचा हात दिला. त्यामुळे, मागील वर्षी गणेशोत्स मोठया धुमधडाक्यात साजरा झाला असून बालन यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झाली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असला तरी भाजपसाठी ही निवडणूक महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने उतरल्याने चुरशीची बनली आहे. तर गेली 20 वर्षे या मतदारसंघात भाजपचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भाजप कसब्यात कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याने आता कसबा विधानसभा निवडणूकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच कसब्याच्या मैदानात उतरले आहेत. खासदार गिरिश बापट यांची भेट घेतल्यानंतर शिरोळे रस्ता येथे फडणवीस यांनी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी बालन यांच्याशीही जवळपास 20 मिनिट चर्चा केली. ही सर्व चर्चा कसबा निवडणूकीवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बालन काय भूमिका घेतात या बाबत उत्सूकता निर्माण झाली असली तरी त्यांच्याकडून भाजपला मदतीची अपेक्षा असल्याची राजकीय चर्चा आहे.