पुणे -हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वातावरणातील प्रदूषकांच्या उत्सर्जनात 2012 ते 2020 या कालावधीत लक्षणीय वाढ झाली आहे. या उत्सर्जनाचे मुख्य स्रोत हे घरगुती उत्सर्जन आणि वाहतूक असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उत्कल विद्यापीठाच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला. यात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
शहराच्या विविध भागांत हे सर्वेक्षण करण्यात आले असून, यामध्ये हवा प्रदूषणाच्या 26 स्थानिक स्रोतांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाद्वारे रियल टाइम दैनंदिन घडामोडींची नोंद घेण्यात आली. यापूर्वी 2012-13 मध्ये या प्रकारचा अभ्यास केला होता.
या सर्वेक्षणाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर, आयआयटीएमचे संचालक प्रा. रवी नंजूदीआह, प्रा. गुफरान बेग, डॉ. बी. एस. मूर्ती आदी उपस्थित होते.
2012-13 मध्ये झालेल्या अभ्यासाच्या तुलनेत 2020 मध्ये झालेल्या अभ्यासात असे निदर्शनास आले की, पुण्यातील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली असून, यामध्ये पर्टीक्युलेट प्रदूषकांची मुख्य भूमिका आहे.
यात पीएम 2.5 मध्ये 70 टक्के आणि पीएम 10 मध्ये 61 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, ऑर्गेनिक कार्बन (81.3%), नायट्रोजन ऑक्साइड (72.8%), व्हीओसी घटक (69.8%) या प्रदूषकांचा समावेश आहे. सल्फर डायऑक्साइड या प्रदूषकाचे उत्सर्जनाचे प्रमाण सर्वात कमी (30.2%) असल्याचे समोर आले.