पुणे – मागील अनेक महिन्यांपासून दुपारच्या वेळेत बंद असलेली पुणे (शिवाजीनगर) – लोणावळा लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना या सेवेचा अधिक फायदा होणार आहे.
करोनामध्ये दुपारच्यावेळेत सुरू असलेली पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद करण्यात आली होती. करोनाचे सावट संपले, तरीही दुपारची सेवा सुरू झाली नाही. त्यामुळे दुपारी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येत होत्या. तसेच, कामानिमित्त लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही लोकल सुरू होण्याची वाट पहावी लागत होती. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून दुपारच्या वेळेतही लोकसेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वेळोवेळी केली जात आहे. या मागणीला आज यश आले असून, पुणे रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळा ही लोकलसेवा दुपारच्या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी शिवाजीनगर येथून लोकल सुटेल, ती 12 वाजून 45 मिनिटांनी लोणावळा येथे पोहचेल. तर 11 वाजून 30 मिनिटांनी लोणावळा येथून लोक सुटेल आणि दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी शिवाजीनगर येथे पोहचेल. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यातत आली.
पुणे- लोणावळा रेल्वे मार्गावर काही प्रवाशी व राजकीय संघटनांकडून दुपारची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे पुण्यातून निघालेल्या डेक्कन क्वीनला मुंबईला पोहचण्यासाठी अर्धा तास उशीर झाला. त्याचा परिणाम अन्य काही ट्रेनवरही झाला. दरम्यान, या आंदोलनानंतर तात्काळ रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळा ही दुपारच्या वेळेत लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.