बारामती : पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत उपस्थित सुनेत्राताई पवार यांच्यासह मान्यवर.
बारामती – बाल वयातून पौगंडावस्थेत येताना होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांच्या शिक्षणाबाबत लहान मुली आणि पालकांमध्ये संकोच असतो. अशा विषयावरील कार्यशाळा काळाची गरज असून, शालेय विद्यार्थिनींना आपण याबाबत शिक्षण देण्याचा सुरू केलेला उपक्रम खरोखर स्तुत्य आहे, असे प्रतिपादन बारामती टेक्स्टाइल पार्कच्या संस्थापक व विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्राताई पवार यांनी केले.
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात शोध किशोरवयीन मनांचा या लहान मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पवार बोलत होत्या. येथील कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या माध्यमातून पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी चॅरिटेबल संस्थेचे संचालक प्रशांत उर्फ नाना सातव व पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे संचालक-सीईओ अमित मोडक उपस्थित होते. या कार्यशाळेत सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. पुण्यातील रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी विद्यार्थिनींना किशोर वय एक नाजूक वळण, बाल लैंगिक शोषण आणि स्वसंरक्षण आदी विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
याबाबत मोडक म्हणाले, या उपक्रमाच पहिले वर्ष असून, बारामतीबरोबर फलटण येथेही अशीच कार्यशाळा आयोजित केली आहे. यात एकूण दीड हजार मुलींनी सहभाग घेतला. पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्राच्या अन्य भागांतून लहान मुलींसाठी लैंगिक शिक्षणावर कार्यशाळा घेतल्या जातील.