गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कामाचे कौतुक
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आढावा बैठक
पुणे – लॉकडाऊनमध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाने पोलिसांच्या मदतीला 5,500 विशेष पोलीस अधिकारी नेमण्याचा उपक्रम चांगला आहे. हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.
करोना नियंत्रण, लॉकडाऊन कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी ते बोलत होते.
करोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे देशमुख यांनी कौतुक केले. यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयाने तयार केलेल्या “लोक भावनांचे सर्वेक्षण’ पुस्तिकेचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे 83 टक्के नागरिकांनी पुणे शहर पोलिसांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप पाटील, पोलीस सह आयुक्त (शहर) डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) सुनील फुलारी तसेच सर्व पोलीस उपायुक्त व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.