सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या

नाभिक संघटनेची मागणी; आंदोलनाचा दिला इशारा

अकोले (प्रतिनिधी) – सलून व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अकोले तालुका नाभिक संघटनेने केली आहे. अन्यथा शासन दरबारी आंदोलन केले जाईल, असा इशारा या संघटनेने दिला आहे.

करोना पार्श्‍वभूमीवर दि. 20 मार्चपासून सुरू असलेला लॉकडाऊन अद्यापही सुरू असल्याने सलून कारागीर प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सलून सुरू करण्यास तातडीने परवानगी देऊन झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. श्री संत सेना महाराज नाभिक संघटना, अकोले तालुक्‍याच्या वतीने अध्यक्ष किरण चौधरी, अमोल कोल्हाळ, गणपत कोल्हाळ, शंकर बिडवे, योगेश बोऱ्हाडे, गणेश पंडीत, दत्तात्रय चौधरी, आत्माराम शिंदे, महेश भराडे आदींच्या सहीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सलून कारागिरांच्या कमाईतूनच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परिणामी चरितार्थ चालविणे मुश्‍किल झाले आहे. तसेच उत्पन्नाअभावी ग्रामपंचायतचे कर, कर्जाचे हप्ते, व्याज, शैक्षणिक खर्च, औषधोपचार आदीचे खर्च भागविणे तर दुरापास्त झाले आहे. आमचा हा व्यवसाय जरी असला तरी त्यातून समाजसेवाच म्हणूनच आम्ही हे करतो. आमची संघटना ही आमच्या एकीसाठी आहे, त्याचे जोरावर आम्ही कोणावरही कधीही अन्याय केलेला नाही. पण आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाभिक समाज बांधवांना शासनाने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

म्हणून आमचीही मागणी आहे की, आम्हाला शासनाने लॉकडाऊन काळासाठी नुकसान भरपाई देऊन, तसेच भविष्यासाठी आर्थिक पॅकेज देऊन सहकार्य करावे. अन्यथा घरात राहून मरण्यापेक्षा आम्ही शासन दरबारी कुटुंबियासमवेत येऊन आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.