पुणे – पीएमपी मालकीच्या सात ठिकाणी असलेल्या जागेत खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. अदानी ग्रुपकडून ही चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. नुकतीच जागेची पाहणी झाली असून, हिंजवडी फेज टू येथे पहिले खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.
या चार्जिंग स्टेशनमधून पीएमपीला ३२.५ टक्के रक्कम मिळणार आहे. यामध्ये हिंजवडी फेज टू, भक्ती-शक्ती (निगडी), भोसरी, कात्रज, बाणेर -सुस रोड, पुलगेट, डेक्कन जिमखाना अशा सात ठिकाणी इ-वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहे. पीएमपीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत. पीएमपीला संचलनातून मिळणार्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यामुळे संचालन तूट वाढत आहे.
त्यामुळे पीएमपीकडून तिकीटाबरोबरच इतर ठिकाणाहून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासन करत आहे. त्यासाठी त्यांच्या काही जागा व्यावसायिक दृष्टीकोनातून विकसित केल्या जात आहेत. तर, काही ठिकाणी नागरिकांसाठी चार्जिंग स्टेशन उभी करून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पीएमपीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सात ठिकाणी पहिल्या टप्प्यात खासगी नागरिकांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या चार्जिंग स्टेशनसाठी आदानी ग्रुप सोबत करार करण्यात आला आहे. या चार्जिंग स्टेशन मागविण्यात आलेल्या निविदेमध्ये सर्वाधिक रक्कम आदानी ग्रुप देणार असल्यामुळे त्यांची निवड करून करार करण्यात आला आहे. त्यानुसार सात ठिकाणच्या जागेची आदानी ग्रुपने पाहणी केली असून हिंजवडी फेज टू येथे चार्जिंग स्टेशन उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
“पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी पीएमपीच्या सात ठिकाणच्या जागेत ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. त्यापैकी एका चार्जिंग स्टेशनच्या कामाला सुरूवात झाली आहे. या चार्जिंग स्टेशनमुळे नागिराकांची सोय होणार असून त्यामधून पीएमपीला उत्पन्न मिळणार आहे.” – संजय कोलते, अध्यक्ष, पीएमपी