पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 ऑगस्ट रोजी पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून जनतेला समर्पित करण्यासाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी असल्याने, लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान केला जाणार आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कृषीविद्यालयाच्या हेलिपॅडवर उपस्थित राहिले होते.
यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. नागरिकांकडूनही गणपती बाप्पांचा जयघोष करत मोदी-मोदी अशा घोषणा देखील देण्यात येत आहेत. सध्या मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात पूजेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर मंदिरात आरती केली जाणार आहे. यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहे. मोदींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे.